Breaking

सोमवार, २२ जून, २०२०

ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांसमोर......

ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांसमोर......

मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडूनही सूचना घेणार, ११ वी प्रवेश प्रक्रियाही लवकरच होणार सुरु 

ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांसमोर......

मुंबई, दि. २२ : शैक्षणिक वर्षाच्या आरंभी विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करावेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यादृष्टीने आज त्यांनी जिओ टीव्ही आणि गुगलमीटद्वारे ऑनलाईन वर्ग कशाप्रकारे भरवता येतात त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. प्रत्यक्ष असे सादरीकरण शिक्षक आमदार, निवडक मुख्याध्यापक व शिक्षक यांचे करून त्यांच्याकडून सुचना मागवून घ्याव्यात असे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सोबत त्यांनी शालेय शिक्षण विभागाची व्हिसी आज घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असलेला इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा सहजरित्या ऑफलाईन देखील उपलब्ध व्हावा व त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी असावी हे पाहण्यास सांगितले. प्रत्यक्षात एक ऑनलाईन वर्गाचे देखील प्रात्यक्षिक त्यांनी गुगल मीटच्या सहाय्याने पाहिले. ऑनलाईन वर्गाचेआयोजन करताना विद्यार्थ्यांना कुठलीही तांत्रिक अडचणी येऊ नये तसेच ती आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा तयार असावी असेही ते म्हणाले.

दहावी व बारावीसाठी जिओ टीव्ही वर दोन वाहिन्या तयार केलेल्या आहेत. जिओ टीव्ही वर पहिली ते बारावी साठी स्वतंत्र ५ वाहिन्यांचे नियोजन आहे असे ते म्हणाले. दिवसाला ४ ते ५ तास दूरदर्शनकडे शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

यंदाच्या वर्षी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी दहावी तर १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतलाकाळे यांनी सांगितले. बारावीचे सर्व पेपर्स संपले होते मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता जुलै १५ पर्यंत बारावीचा निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून दहावीचा निकाल जुलै अखेरीपर्यंत लावण्याचे प्रयत्न आहेत असे त्यांनी सांगितले.

दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुमारे दीड महिना चालेल. ऑनलाईन पोर्टलमध्येही या वर्षापासून आवश्यक बदल करून ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल एप अशा सुविधा देण्यात येत आहेत. विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती  येथे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतर ठिकाणी व ग्रामीण भागात ऑफलाईन चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालवण्यासंदर्भात निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.